विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही, आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

20

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही.विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन  विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा आमदारांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ.प्रवीण दरेकर आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत फडणवीस यांच्याशिवाय सरकार मंजूर नाही, असा ठराव  सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निकालाची आकडेवारी मांडून महायुतीचा पराभव झाला हा प्रचार खोटा असल्याचे दाखवून दिले.  फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेतृत्व मी केल्यामुळे  या निकालाची जबाबदारी माझी आहे. आपण सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं. केवळ राजकीय गणित जुळवाजुळवीमध्ये आम्ही  कमी पडलो. मला मोकळं करून काम करायची संधी द्या, असे मी निराशेतून बोललो नाही.देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, तर लढणारा आहे.

चारही बाजूनी  घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत.कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो आहे आहे तर ते खरं नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती होती आणि ती आजही आहे,असेही श्री.फडणवीस म्हणाले.उबाठा ला मुंबई महानगर क्षेत्रात मतदारांनी नाकारले असल्याचे श्री. फडणवीस यांनी निकालाच्या आकडेवारीसह निदर्शनास आणून दिले. फडणवीस म्हणाले संविधान बदल, मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यावर खोटी माहिती पसरवून त्या आधारे महाविकास आघाडीने विजय मिळवला.हा खोटा प्रचार विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. त्या मुळे आपण सर्वांनी आतापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस हे बाहेर राहून सरकार मान्य नाही, असा ठराव मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी मांडला.आ. शेलार म्हणाले की,देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्याचा लेखाजोखा जेव्हा मांडला जाईल तेव्हा त्यात 2019-24 या काळात त्यांनी संकटांचा मुकाबला कसा केला, याचा गौरवशाली अध्याय लिहिला जाईल. त्यामुळे फडणवीस यांच्या अनुपस्थितीत सरकार भाजपा विधीमंडळ पक्षाला मान्य नाही.या ठरावाला उपस्थित सर्व आमदारांनी  उभे राहून, टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वतःला मागे ठेवून आमदार आणि कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे म्हणून फडणवीस काम करतात. 42 खासदार आणि 122 आमदार असा विक्रम मोदीजींच्या यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस यांनीच केला. फडणवीस हे सरकारमध्ये नसणे हे आम्हाला मान्य नाही. आ.नितेश राणे यांनीही फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविणारे भाषण केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.