माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना काल (गुरुवारी) निलंबन करण्यात आलं. निलंबनाबाबत राज्य सरकारने आदेश काढत परमबीर यांना एक दणका दिला आहे. परंतु. आज परमबीर सिंह यांनी राज्य सरकारचा निलंबनाचा हा आदेश धुडकावला आहे. ‘ज्येष्ठतेनुसार पोलिस महासंचालकांकडून आलेला हा आदेश आपण स्वीकारणार नसल्याचं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबनाबाबतच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या निलंबनावर कालच शिक्कामोर्तब करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांनी समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तसेच ते सेवेतही रुजू न झाल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावर खडणीचे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल आहेत.

‘आपण स्वत: पोलिस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. हे लक्षात घेता पोलिस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही, असे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हा आदेश आपल्याला देऊ शकतात, असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे आहेत. सध्या ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. त्यामुळे ते सध्यातरी परमबीर यांच्या निलंबनाचा आदेश देऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे बघणे महत्वाचे आहे.