अधिवेशनात न्याय मिळतो का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे – अजित पवार

9

राज्यात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्रा, द्राक्ष, सोयाबीन, हरभरा, कापूस ही पीकं शेतकऱ्याकडे पडून राहिल्याने अधिवेशनात बळीराजाच्या प्रश्नांना न्याय मिळतो का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. दिवसभरात झालेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी माध्यमांसमोर मांडला. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता याची आठवण त्यांनी करून दिली.

महामहीम राज्यपाल यांनी केलेल्या भाषणात पूर्वीचेच मुद्दे आले आहेत. या अभिभाषणात ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही. तसेच महागाईसारख्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख अभिभाषणात नाही. सभागृहात विरोधी पक्षाने मांडलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

विधिमंडळाच्या कामकाजाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अधिवेशन काळात पक्षप्रवेश करण्यासाठी जातात. त्यांच्या लेखी विधिमंडळ कामकाजाला काहीच किंमत दिसत नाही, असा शेरा अजितदादांनी मारला. महापुरुषांचा अवमान यांच्या कारकिर्दीत होतो, मात्र महापुरुषांच्या स्मारकाबद्दल कोणताही उल्लेख होत नाही. लोकांच्या भावनांशी हे सरकार खेळ करतंय, या सरकारला नक्की काय करायचेय हे अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.
अंगणवाडी सेविकांना शब्द दिला असतानाही त्यांना पुन्हा मोर्चा काढावा लागतो. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे तरी त्यावर मार्ग निघत नाही. शिष्टमंडळांना भेटूनही त्यांचे समाधान होत नाही. एसटी कर्मचाऱ्यांची पगार थकबाकी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे, असे अजित पवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.