कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याचा उपोषणस्थळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कोल्हापूर: राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या अडीच महिन्यापासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी संपावर आहे. या संपादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरिही अद्याप कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. कोल्हापुरातील इचलकरंजी आगारात एका कर्मचाऱ्याचा परिवहन मंत्र्यांची पत्रकार परिषद पाहताना मृत्यू झाला आहे. मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा आगारातील कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कोल्हापुरातील इचलकरंजी आगारामध्ये शरणाप्पा निरमलप्पा मुंजाळे (वय ३१, अक्कलकोट) या कर्मचाऱ्याचे मंत्र्यांची पत्रकार परिषद पाहत असताना मृत्यू झाला आहे. एसटी कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार करण्यापूर्वीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७२ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर इचलकरंजी आगारात तणावाचे वातावरण आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नसल्यामुळे मुंजाळे यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. अडीच महिन्यानंतरही प्रश्नावर तोडगा निघत नसल्यामुळे कर्मचारी पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आयजीएम रुग्णालयात मोठ्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात रोष निर्माण झाला असून राज्य सरकारमुळेच आणखी एकाचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.