गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना-भाजप युती कायम राहिली असती – संजय राऊत

मुंबई: भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच ते म्हणाले की,भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. गोपीनाथ मुंडे असते तर राज्याचं राजकारण जे आज आहे ते तुम्हाला दिसलं नसतं. शिवसेना आणि भाजपची युती रहावी म्हणून ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. असं संजय राऊत म्हणाले.
सध्या या देशातील विरोधी पक्षातील आघाडी एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि राहील. वयाच्या ८१ व्या त्यांनी पदार्पण केलं असून आजही राजकारणात पवार हे तितकेच सक्रिय नेते आहेत. त्यामुळे ते आम्हालाही आणि तरूणांनाही लाजवतील कारण त्यांचं अखंड वाचन आणि चिंतन मी पाहत असतो. महाराष्ट्राने देशाला जे काही नेतृत्त्व दिलेलं आहे यामध्ये शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वोच्च आहेत. महाविकास आघाडीचा एक प्रयोग सुरू आहे. परंतु हा प्रयोग शरद पवार यांच्या सहकार्याशिवाय आणि भूमिकेमुळे शक्य नव्हता. त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत राहो.