देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

45

जळगाव : जळगांव जिल्हा दौऱ्यादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमळनेर येथे होत असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावर केले. येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अमळनेरच्या उपकेंद्रात स्वतंत्र व्यवस्था व्हावी. या केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर होईल हे पाहावे, रेल्वेच्या ११ हजार जागांची भरती निघणार आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आपली मुलं, मुली दिसत नाहीत. त्यामुळे विनाविलंब हे केंद्र सध्या भाड्याच्या जागेत सुरु करा, असे निर्देश पाटील यांनी दिले.

आपल्याकडे शिक्षणासाठी इमारती उभ्या करतो, पण अभ्यासासाठी लागणारा ज्ञानसाठा (कन्टेन्ट बिल्डिंग) उभा करण्यात कमी पडतो, ते आता उभं करणं गरजेचे असून जगभरातल्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात, अनेक देशांना आपल्याकडून उत्तम मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या दृष्टीने शासन शिक्षणात अमूलाग्र बदल करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुलसचिव डॉ.दिलीप भरड, प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, वित्त व लेखा गोविंद कतलाकुटे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.