राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावर मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन – चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत आदर्श कामगिरी करून महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 साली गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली, या परीक्षेमध्ये महेश घाटुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, प्रीतम सानप या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभम पवार यांनी बाजी मारली असून, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. अपार जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही अत्यंत आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही अभिनंदन. आपण सर्वच आदर्श कामगिरी करून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावाल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, यानंतर आता उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. विविध न्यायालयात किंवा न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.