पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण

मुंबई: काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली. मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ज्या कामगारांनी आपला घाम गाळून काशीमध्ये हा भव्य परिसर तयार केला, त्यांचे आभार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मानले. कोरोनाच्या बिकट काळातही त्यांनी काम थांबवले नाही. मला या श्रमिकांना भेटण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है, असे म्हणत पंतप्रधान एकदम तल्लीन झाले.
जिथे गंगा आपली धारा बदलून वाहते. त्या काशीला कोण रोखू शकते, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे. अहिंसा आणि तपस्याचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत तर चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदास ते स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय अशा कित्येकांचा या भूमीशी संबंध आहे. किती ऋषी आणि आचार्यांचा संबंध आहे, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
पंतप्रधान मोदींनी जनतेला भगवान संबोधत त्यांच्याकडून तीन गोष्टी मागितल्या. ते म्हणाले, गुलामीच्या मोठ्या कालखंडाने भारतीयांचा आत्मविश्वास चक्काचूर केला. त्यामुळे आपण आपल्याच सृजनावरील विश्वास गमावून बसलो. आज हजारो वर्ष जुन्या या काशीतून मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सृजनाची कास धरावी. नवनिर्मिती करा. इनोवेटीव पद्धतीने काही करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ईश्वराचे रूप असल्याचे ते म्हणाले.