मुंबईतील लग्नसोहळा, पार्टी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी महापालिकेची नियमावली जाहीर; वाचा काय असतील नियम

मुंबई: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे सध्या सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. राज्यामध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये  दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून  आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. लग्नसोहळा, ख्रिस्मस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी  वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि गर्दी केली जाते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता बीएमसीकडून सण आणि कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही हॉलमधील कार्यक्रम, लग्नसोहळा, पार्टी, मिटिंग, धार्मिक कार्यक्रम किंवा राजकीय मेळाव्यात हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसावी. या कार्यक्रमात सहा फुटांचे सामाजिक अंतर आणि कोविड-19 गाईडलाईन्सचे पालन करणे बंधनकारक आहे.

खुल्या मदैनावरील कार्यक्रम, लग्नसोहळा, पार्टी, मिटिंग, धार्मिक कार्यक्रम किंवा राजकीय मेळाव्यात क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोक उपस्थित नसावेत. समारंभात सहा फुटांचे सामाजिक अंतर आणि कोविड-19 गाईड लाईनचे पालन करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या हॉटेलमध्ये कार्यक्रम असेल आणि हॉटेलमालक किंवा आजोकाने सहा फूट अंतर पाळून 200 पेक्षा जास्त लोकांसाठी जागा असल्याचा दावा केला तर संबंधित महापालिका प्रभागाची परवानगी घ्यावी लागेल.

कोणत्याही समारंभ किंवा कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोक असतील तर स्थानिक महानगरपालिका प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तिथे जाऊन नियमांचे पालन केले जात आहे की नाही ते तपासावे. मुंबई महानगर पालिकेने जारी केलेले हे आदेश 20 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.