आरोग्य विभागाची परवानगी, पहिली ते सातवीचे वर्ग लवकरच होणार सुरू

मुंबई: राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास आरोग्य विभागाला कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 10 दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिले पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरू करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सने मत मांडले आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचे टोपेंनी म्हटले आहे. परंतु याविषयीचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या राज्यात पाचवी पासून पुढील वर्ग सुरू आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. आता आरोग्य विभागाने देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी केली जातील, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण होण्याचा दर देखील चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50% परवानगी दिली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळे गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही.  बिनधास्तपणा जाणवतोय.  ही मानसिकता घातक आहे.  जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!