राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?

मुंबई: कोरोना आणि कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (31 डिसेंबर) मध्यरात्रीपासून निर्बंध लागू करण्यात आले आहे. नव्या नियमावलीनूसार कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यास 50 संख्येची मर्यादा घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री, टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. यावेळी अनेक गोष्टीवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

उच्चस्तरीय झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवरही चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास लॉकडाऊनबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. तसेच, सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध काल (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून अमलात आले आहेत.

या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, कोरोना कृती दलाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.