ओमिक्रॉनचे आणखी 14 रुग्ण आढळले, देशातील रुग्णसंख्या 87 वर

मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन जगभरातील देशांमध्ये वेगाने पसरत आहे. याचा धोका भारताला देखील आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी देशभरात आणखी 14 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 87 वर पोहचली आहे.

देशात ओमिक्रॉनमुळे चिंता वाढत चालली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशामध्ये गुरुवारी यात 14 रुग्णांची आणखी भर पडली आहे. कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे 5 रुग्ण आढळले. राजधानी दिल्लीमध्ये चार आणि तेलंगणामध्ये चार रुग्ण आढळले तर गुजरातमध्ये एक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 87 झाली आहे.

चिंतेची बाब म्हणजे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 32 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यामधील 25 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्यामधील अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारपासून ते सर्वच राज्य सरकारकडून योग्य त्या उपाय योजना आखल्या जात आहे. त्याचप्रमाणे लसीकरणावर भर दिली जात आहे.