पुण्यात उद्यापासून पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय

पुणे: कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता मुंबई, ठाणे, नवीन मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय काल, सोमवारी घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुण्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील हद्दीतल्या पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माहितीनुसार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ इतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्यापासून पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यात हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची आज नोंद झाली. सातत्याने ही रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे अनुषंगाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यात आतापर्यंत ११ लाख ५४ हजार ७७६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी आतापर्यंत १९ हजार ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ लाख ३१ हजार ४०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यात ३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत पुणे मनपामध्ये ६३, पिंपरी चिंचवडमध्ये ३६, पुणे ग्रामीणमध्ये २६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.