नगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का; छिंदमच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी

7

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने घेण्यात आलेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपनेच बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक नऊसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी एकूण ३ हजार १०६ मते घेत ५१७ मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी (२५८९) दुसऱ्या स्थानी तर सुरुवातीला आघाडी घेतलेले मनसेचे पोपट पाथरे (१७५१) तिसऱ्या स्थानी फेकले गेले.

या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी मतमोजणी झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मनसेचे पोपट पाथरे यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे चित्र बदलते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पाचव्या फेरीपासून पाथरे यांचे मताधिक्य खूपच कमी होत गेले आणि अखेर भाजपचे परदेशी विजयी झाले.

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यामध्ये भाजपने ऐनवेळी आपला उमेदवार बदलून परदेशी यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सुरेश तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पूर्वीच्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचा श्रीपाद छिंदम विजयी झाला होता. त्यानंतर त्याला उपमहापौरपदही मिळाले होते. त्या काळात शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने त्याला राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्याचे पद रद्द करण्याचा ठराव करून सरकारकडे पाठवण्यात आला. मधल्या काळात मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक लागली. यामध्ये छिंदम याने अपक्ष निवडणूक लढवून पुन्हा विजय मिळविला होता. त्यानंतर सरकारचा निर्णय आला आणि त्याचे पद रद्द झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.