कोण अजित पवार?, मी त्यांना ओळखत नाही, वादळ, पूर आले तेव्हा कुठे होते – नारायण राणे

सिंधुदुर्गः संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळे नितेश राणे अज्ञातवासात गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणेंसुद्धा सिंधुदुर्गात असून, त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कोण अजित पवार, मी त्यांना ओळखत नाही. वादळ, पूर आले तेव्हा अजित पवार कुठे होते, असंही म्हणत नारायण राणेंनी अजितदादांवर टीकास्त्र सोडलंय.

यावेळी त्यांना विधानभवनाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वर्तनावर प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार यांनी आज सभागृहात सदस्यांना समज दिल्याचंही राणेंना सांगण्यात आलं. त्यावर राणे उसळले. माझी मर्यादा काय आहे हे मला माहीत आहे. मी बाकी कोणाची पर्वा करत नाही. कायद्याने वागायचं मला कळतं. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढे वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधन नाही. तो संसदीय शब्द नाही. कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांचा काय रेफरन्स देता? असा सवाल राणेंनी केला.

पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. एका आमदारासाठी एवढी यंत्रणा लावली आहे. कोकणात काय आतंकवादी आले की पाकिस्तानातून कोणी आलं? साधं एक खरचटलं… मारहाण झाली. मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. आमदाराला मारहाण झाली का? की आमदाराने मारहाण केली? नितेश राणेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

त्यांचं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. निवडणूक संपेपर्यंत त्यांना डांबून ठेवण्याचा डाव आहे. 307 कलम या गुन्ह्यात लावलं आहे. मेंदू, हृदय आणि डोक्याला मार लागला तर हे कलम लावलं जातं. कारण या भागांवर लागलं तर मृत्यू होता. मात्र या प्रकरणात फक्त खरचटलं आहे. तरीही 307 कलम लावलं आहे, असं ते म्हणाले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारू पासिंग होते. काय केलं तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.