विकासाच्या ऐवजी राज्यातील गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार

राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, विकासाचा वेग डबल होईल, म्हणून सांगितलं गेलं. मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे, असा आरोप करुन राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते नियम 292 अन्वये विरोधी पक्षाच्यावतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत, अशी सडेतोड टीका अजित पवारांनी यावेळी केली.
राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत आहेत. तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरुन दहशत निर्माण करत आहेत. खून, दरोडे, अपहरण, हत्या, घरफोड्यांनी राज्यातले नागरीक हवालदिल झाले आहेत. जुगार, मटका, गुटखा, डान्स बार हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर, महिला आमदारांवर हल्ले सुरु आहेत. धार्मिक वाद निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात पुन्हा गँगस्टरनी डोके वर काढले आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत, अशी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीची यादीच अजित पवारांनी सभागृहात सादर केली.
लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये
उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरवला जाणार नाही, राज्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेचे मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणलाही अधिकार नाही, असे अजितदादा म्हणाले.
सत्तारुढ पक्षाचे दादरमधील आमदारांनी गोळीबार केल्याचे प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणातील बॅलेस्टिक रिपोर्ट आला की ती गोळी आमदाराच्या बंदुकीतूनच सुटल्याचे स्पष्ट झाले. आता नवीनच माहिती पुढे आली की, अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. अज्ञात इसमाने गोळी झाडली असेल तर तो कोण होता, पोलिसांनी त्याचा तपास केला का? सरळ सरळ आपल्या आमदारांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सरकार मनमानीपणे पोलीस दलाचा वापर करुन घेत आहे. क्षुल्लक कारणावरुन ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. दोन स्थानिकांचा मृत्यू झाला, एकजण अत्यवस्थ आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, हे या गोळीबारातून समोर येते, असे अजित पवार म्हणाले.
राज्यात पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीत…
कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. राज्यात पत्रकाराची हत्या हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. या हत्येमागील सर्व बाजूंचा तपास झाला पाहिजे आणि केवळ हल्लेखोर आंबेरकर नाही तर त्याच्यापाठीमागचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली.
कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे
विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भरपूर प्रयत्न शिंदे गटाने केले. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याची शिक्षा संजय कदमांना काय दिली? लगेच ‘ए.सी.बी.’ची नोटीस दिली. ‘फोडा नाही तर झोडा’ ही सत्ताधाऱ्यांची नीती जास्त काळ टिकणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
विरोधकांवर हल्ले होत असताना त्यांच्या सुरक्षेकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे
एका बाजूला पक्षात ओढण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर होतो आहेच, केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा त्यांच्या पाठीमागे लावला जात आहे. आता विरोधकांवर हल्ले होत असताना त्यांच्या सुरक्षेकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर भ्याड हल्ला झाला. या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एका महिला आमदारावर हल्ला होतोच कसा ? याच उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावं लागेल, असे ते म्हणाले.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले. त्यानंतर पोलीसांनी रविकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होते. या प्रकरणात सरकारने गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मी केली होती. त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तरी सरकारने तातडीने हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!