कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

मुंबई: भारतात करोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल अशी घणाघाती टीका राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आता बहुतांश राज्यांत झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चिंता वाढली असून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. मात्र भाजपवालेच त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारोंच्या संख्येने लोक जमवत आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे, असे मलिक यांनी नमूद केले आहे.