मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला आढावा
मुंबई: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिल्या. कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नगरविकासमंत्री शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असूनही दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन मुंबई महानगर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. या क्षेत्रात रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णालयाची गरज मर्यादित असली तरीही आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी साऱ्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी या बैठकीत दिले.
एमएमआर क्षेत्रातील सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालये, तसेच कोरोना केंद्र सज्ज करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले. त्यासोबतच या रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटचा पुन्हा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नियमितपणे कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग होईल, याबाबत दक्ष राहण्यास त्यांनी सांगितले. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ यांना देखील मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.