मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करु नये; राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोमणा

मुंबई: राज्य सरकारने दुकानांवर मोठ्या अक्षरात मराठी पाट्या बंधनकारक केल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक पक्षांनी आणि व्यापारी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात २००८-०९ मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. मराठी पाट्यांचे श्रेय फक्त मनसेचे आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कोणी करु नये असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी करत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलन केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.
काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांववील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माइया महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वाचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंगलबजावणी नीट करा, ह्यात आणखी एक भानगड सरकारन॑ करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वाना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.