पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
मुंबई: राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात आणि मोठ्या ठळक अक्षरात असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशा प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या या मराठीत असणार आहेत. मराठी पाट्या असाव्यात अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही सुरुवातीपासूनची मागणी आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयाचे श्रेय मनसेचे असल्याचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. तर आता मराठी पाट्या कराव्यात अशी मनसेचीही मागणी आहे. व्यापाऱ्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. परंतु पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा खर्च जास्त आहे. असा धमकीवजा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 14, 2022
राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशी मागणी मनसेकडून यापूर्वीही करण्यात आली होती. यासाठी मनेसैनिकांनी आंदोलनही केले होते. या आंदोलनात दुकानं बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात मराठी भाषिकांचा असल्यामुळे दुकानावरील पाट्या या मराठीत असाव्यात अशी आक्रमक मागणी होती. कायद्यानुसारही दुकानाच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असा नियम आहे. राज्य मंत्रिमंडळात मराठी पाट्यांबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मनसेनंही निर्णयाचे स्वागत करुन तात्काळ अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. “ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं असून धमकीवजा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे.