रुपाली चाकणकरांनी मांजरेकरांकडे ‘वरन भात लोन्चा …’ मधील बोल्ड दृश्यांबाबत मागितला खुलासा

मुंबई: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबईतल्या मिल संस्कृतीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये काही दृष्यांवर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे वादात अडकले आहेत. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी महेश मांजरेकांकडे खुलासा मागितला आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना,कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे,  अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत दिली आहे.

चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढा, अशी मागणी आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं होतं. मुंबईच्या जंगलातला हा धूर कोणालाच सुखासुखी जगू द्यायचा नाही, सगळ्यांची वाट लागणार…काँक्रिटच्या जंगलातलं वास्तव या टॅग लाईनने हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलवरुन वाद झाल्यानंतरही मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं. त्यामुळे महिला आयोग आणि केंद्रीय माहिती व प्रसारण खातं याविषयी आता नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.