चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत; संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हा टोला लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉ. तात्याराव लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.
यावेळी त्यांनी गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांशी उद्या भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.