नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

मुंबई: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे याबाबत माहिती देताना गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीसाठी पक्षाची तृणमूल काँग्रेस व काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचं सांगितलं.

महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यावेळी अयोध्येतून लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील मुख्य नेते गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्वादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.