बच्चू कडूंची बुलढाण्यात धडाकेबाज एन्ट्री; भाजपच्या माजी मंत्र्यांवर ‘प्रहार’

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये बच्चू कडू यांनी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीमध्ये दमदार विजय मिळवित धडाकेबाच एंट्री केली आहे. भाजपच्या माजी मंत्र्यांना धोबीपछाड देत त्यांच्या प्रहार संघटनेने हा विजय मिळविला आहे.

संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्यांनी माजी मंत्र्यांना जोरदार टक्कर दिली. आजी आणि माजी मंत्र्यांच्या गटामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत होते. त्याप्रमाणे आजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच येथील निवडणुकीत नशीब आजमवित 12 जागांवर विजय मिळविला आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला 5 जागा तर राष्ट्रवादी, भाजप आणि वंचितला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मतदार संघातील संग्रामपूर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्‍वास अनेकांना होता. परंतु, एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.