गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी

गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी 19 जानेवारीला जाहीर करणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र काही जागांचा तिढा न सुटल्याने भाजपची यादी येण्यास वेळ लागला. अखेर भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही. तिथून विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनोहर पर्रीकरांचे यांचे कुटुंब हेच आमचे कुटुंब असून उत्पल पर्रीकर यांना दुसऱ्या जागेवर उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पर्रीकर यांचे कुटुंब हेच आमचे कुटुंब आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पणजी वगळता दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यांनी जागा नाकारली होती. दुसऱ्या जागेची चर्चा सुरू आहे. ते त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे, असे फडणवीस म्हणाले.

उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून प्रचारही सुरू केला होता आणि घरोघरी जाऊन ते मतदारांना भेटत होते. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आम्ही गोव्यातील तीन सर्वसाधारण जागांवर एसटीचे उमेदवार उभे केले आहेत, तर एका सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार उभे केले आहे. १२ ओबीसी उमेदवार आहेत, ९ अल्पसंख्याक (ख्रिश्चन) उमेदवार आहेत, असे भाजप नेते अरुण सिंह म्हणाले.