ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत 50 वर्षांहून अधिक काळ योगदान

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार लोकमत वृत्तपत्राचे समन्वय संपादक दिनकर रायकर यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिलं.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला मात्र फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. औषधोपचार करण्यात आले, मात्र त्याचा काही फायदा होत नव्हता. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून जास्त अनुभव होता. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते.

राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार

राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!