नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक: कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. तसेच उल्लेखनीय काम सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत प्रशासनाकडून होईल; तिसऱ्या लाटेत धोका कमी असला तरी तरी परिस्थिती अद्यापही कोरोनाशुन्य झालेली नाही, त्यामुळे लसीकरणासह टेस्टींगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे आवाहन आज राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या वंचित नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित करावे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन ४०२ मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
अन्यथा आस्थापनांवर कारवाई
मॉल्स, मोठी व्यापारी संकुले व किरकोळ दुकानदारांनी लसीकरण प्रमाणपत्राची शहानिशा केल्याशिवाय ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करू नये. जी दुकाने याची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येईल त्यांच्यावर बंद/सील करण्याची कठोर कारवाई करण्याची संबंधित स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने करावी, अशा सूचना भुजबळांनी केल्या. लग्न समारंभ ही कोरोना वाढीच्या संक्रमणातील मोठी सुप्रभात स्प्रेडर असून एखाद्या दुकानात ग्राहक काम संपले तर लगेच निघून जातो, परंतु लग्न समारंभातून तासन् तास लोक विनामास्क वावरताना दिसतात. तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर 50 च्या उपस्थितीने बंधन आल्याने आता लोक वाड्या, वस्त्यांवर खुल्या वातावरणात गर्दी करताना दिसतात. अशा कार्यक्रमांवर वॉच ठेवून दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या.