नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – छगन भुजबळ

10

नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर स्वबळाची तयारी ठेवा, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

करोनामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार अशी चर्चा असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकादेखील वेळेत होण्याची चिन्हे असल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्षीय कामकाजाचा आढावा घेत ते म्हणाले, की महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले, तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र, सन्मानजनक जागा न मिळाल्यास संपूर्ण जागांवर लढायची तयारी करावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागांत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळांनी केल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.