जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसारखे वैविध्यपूर्ण प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात जपानने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.

गेट वे ऑफ इंडिया येथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जपानचे 45 जणांचे शिष्टमंडळ, अधिकारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी सुमो व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारत आणि जपान यांचे पूर्वापार संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. यापुढेही ठरेल असा मला विश्वास आहे. त्याच दिशेने काम करण्याचा निर्धारही  करू. ऑक्टोबर 2013 मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे. या कराराचे आज आपण नूतनीकरणच करत आहोत. गेल्या दहा वर्षांत या करारातील उद्दिष्टांची जी पूर्ती झाली त्यासाठी  सर्वांचे अभिनंदन करतो आणि या नव्या करारासाठीही शुभेच्छा देतो.

जपान आणि महाराष्ट्रचा गुण लढवय्येपणा, उद्यमशीलता आणि नावीन्याचा ध्यास घेणारा आहे. कुस्ती दोन्हीकडे लोकप्रिय आहे. त्यामुळे कुस्तीबाबत महाराष्ट्राचे क्रीडा संचालनालय आणि वाकायामा प्रीफेक्चर रेसलिंग फेडरेशन (Wakayama Prefecture Wrestling Federation) यांच्या दरम्यान होणारा हा करारही महत्वाचा आहे. यामुळे कुस्तीमधील प्रशिक्षणापासून ते खेळाडूंच्या सुविधांबाबत आदान-प्रदान होईल. तसेच खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र शासन आणि जपान यांचे दहा वर्षापासून मित्रत्वाचे संबध

वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही म्हणाले, की महाराष्ट्र राज्य आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात  सुमो व कुस्ती खेळ याबाबत सन 2013 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. आजच्या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांच्या विकासात भर पडेल असेही श्री. शुहेही म्हणाले. या कराराअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्प होते. कोयासन विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण, ‘यशदा’मार्फत महाराष्ट्रातील शहरी विकास अधिकाऱ्यांसाठी वाकायामा येथे प्रशिक्षण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी जपानी आदरातिथ्य (Omotenashi) प्रशिक्षण, शालेय विद्यार्थींसाठी सांस्कृतिक वारसा प्रशिक्षण, जपानी मार्गदर्शक प्रशिक्षण,  वाकायामा येथील हेंगू अभ्यागत केंद्र व अजिंठा अभ्यागत केंद्र यांच्यात सामंजस्य करार, कोयासन विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार, टोकियोमध्ये एमटीडीसी माहिती कार्यालय आणि औरंगाबाद आणि मुंबई येथे वाकायामा कार्यालय उघडणे, वाकायामा येथून या कार्यालयांमध्येअधिकारी प्रतिनियुक्ती, ट्रॅव्हल एजन्टसाठी परिचय, पर्यटन प्रसिद्धी उपक्रम, अजिंठ्यावरील माहितीपट कार्यक्रम पार पडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!