मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला न आल्याने भाजप केंद्रीय नेतृत्व फडणवीस आणि बावनकुळेंवर नाराज

56

दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर देत लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या. अब कि बार चारसो पारचा नारा रोखण्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीला यश आले. महायुतीला लोकसभा निवडणुकेमध्ये बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र भाजपा कोअर कमिटीची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्र महायुतीला लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळण्याच्या गोष्टींवर चर्चा झाली. घटक पक्षाचा किती फायदा या निवडणुकीमध्ये भाजपाला झाला ? यावर देखील मंथन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपयशाची जवाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याच्या इच्छेवर मात्र पक्षनेत्यांकडून यावेळी चर्चा करण्यात आली नसली तरीही मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला न आल्याने त्याचा मोठा फटका भाजपाला बसल्याचा सूर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे लावल्याची खात्रीलायक बातमी आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाची दाहकता माहित असून देखील आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने लोकसभेच्या जागांमध्ये झालेली घट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जिव्हारी लागली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने भविष्यात महाराष्ट्र भाजपात नेतृत्व बदल होतो कि काय? या चर्चांना सध्या उधाण आल आहे.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे कळीचे मुद्दे ठरतील यात शंका नाही. सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक या मुद्यांचा कसा वापर करतात आणि यशस्वी होतात का? हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.