महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत अजून एखादा उमेदवार उभा करून मतविभागणी करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जातोय – अजित पवार

23
महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत अजून एखादा उमेदवार उभा करून मतविभागणी करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जातोय, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीमार्फत संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीला पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पार्टी, आरपीआयचे अनेक गट तसेच इतर संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. कारण नसताना काही जण वेगवेगळ्या अफवा उठवत आहेत. यातून महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये कोणतीही चलबिचल होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला असल्याचे अजित पवार म्हणाले.
महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या मुद्द्यांवर महाविकास आघाडीकडून सभा, रोड शो आयोजित केले जाणार आहेत. त्यात वेगवेगळ्या घटकांना त्या भागातील लोक येऊन मार्गदर्शन करतील, अशी प्रचार यंत्रणा राबवण्यात येईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पाच वर्षे भाजपचे निर्विवाद बहुमत होते. त्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला, कोणाचाही वचक नव्हता, याची फार मोठी किंमत पिंपरी-चिंचवड शहराला मोजावी लागली आहे, याची आठवण अजित पवारांनी करून दिली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. पत्रकारितेवर हल्ले म्हणजे लोकशाही व संविधान धोक्यात आणण्याचे काम होत आहे. राज्यकर्ते कोणीही असले तरी राजकीय हस्तक्षेप न करता जो दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहीजे, असे मत अजित पवारांनी मांडले. निवडणुकीला जातीय रंग देण्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला सर्व जाती-धर्म-पंथांबद्दल आदर आहे. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहून सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.