कसब्यात खासदार गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडरसह प्रचारात, भाजपने कंबर कसली
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ठाण मांडून बसले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ह्या पोटनिवडणुकांकडे बारीक लक्ष्य दिलं आहे. त्यांनी काल खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी ऑक्सिजन सिलेंडर सह प्रचारात सहभाग नोंदवल्याने अनेकांना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीची आठवण झाली.
मुक्ता टिळक यांच्यानंतर भाजपने हेमंत रासने यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज भाजपसह, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, आठवले गट रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, लोकजनशक्ती पार्टी,पतीत पावन संघटना हे सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या मेळाव्यात खासदार गिरीश बापटांनी ऑक्सिजन सिलेंडरसह कार्यक्रमात उपस्थिती लावली. हा मेळावा केसरीवाडा, नारायण पेठ येथे पार पडला.
पुण्यातील कसबा पेठ मतदार संघावर गिरीश बापटांनी जवळपास 25 वर्ष वर्चस्व गाजवलं आहे. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर भाजपने हा मतदार संघ मुक्ता टिळकांसाठी सोडलं. त्यातच आता मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यासाठी पोटनिवडणुक लागलीय. सुरूवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपने उमेदवारी देणार असल्याचं समजत होतं. परंतु पक्ष श्रेष्ठींनी हेमंत रासने यांना आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने पुण्यात पोस्टरमधून यावरून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर खास करून देवेंद्र फडणवीस यांनी या पोटनिवडणुकांकडे जातीनं लक्ष्य घातलं आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सध्या कसब्यात प्रारूप मतदान यादीत दोन लाख 74 हजार 377 मतदार होते. अंतिम यादीत 1051 मतदार वाढले आहेत. या मतदारसंघात सध्या दोन लाख 75 हजार 427 मतदार आहेत. प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नवमतदार, समाजातील वंचित घटकांसाठी नोंदणीच्या खास मोहिमांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीनंतर अंतिम यादीत मतदार वाढले आहेत. तसेच कसबा पेठ पोटनिवडणुक मतदारसंघाला ‘हार्ट ऑफ पुणे सिटी’ असेही संबोधले जाते.