राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, ‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे. नाशिक, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पाऊस पडत आहे. नाशिकनगर, धुळे, नंदुरबारात  आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर जळगाव व नगरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामद्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाच्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.