अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न तातडीने सोडवा – अजित पवार

9
राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.
राज्यातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, कापूस, हरभरा या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत आले आहेत. अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारधारेचे सरकार असल्याने या सर्व पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक विश्वास देण्याकरीता स्थगन प्रस्तावावरमार्फत सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची आग्रही मागणी अजित पवारांनी विरोधी पक्षाच्यावतीने केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.