पोलिस भरतीवेळी होणारी उमेदवारांची गैरसोय दूर करावी – अजित पवार
पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास व भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 यावेळेत घ्यावी, आदी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केल्या.
विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार म्हणाले की, मुंबईसह राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या निवास, भोजनाची गैरसोय होत असल्याने, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर केल्या पाहिजेत.