राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव – अजित पवार
जागतिक महिला दिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर जरब बसवावी, अशी मागणी अजितदादांनी केली.
प्रत्येक क्षेत्रात आपल्या माता-भगिनी, पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाजाच्या विकासात योगदान देत आहेत. या महिलांना अज्ञान, अंधश्रद्धा, पुरुषी गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास जगविण्याचे काम राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महिलांना एक दिवसाचं झुकतं माप नको, तर रोज समान संधी मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आपण जर असं करु शकलो, तर जागतिक महिला दिन सार्थकी लागला, असं म्हणता येईल, अशी भावना अजितदादांनी व्यक्त केली.