मेटे – मुंडे संघर्ष अटळ, बीड लोकसभा लढणारच – ज्योती मेटे
बीड : शिवसंग्रामचे दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी बीड मधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पुढे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. नुकतीच बीड मध्ये शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्योती मेटे यांनी याकरिता आपल्या शासकीय नोकरीचा देखील राजीनामा दिल्याची बाब समोर आल्याने आता मेटे विरुद्ध मुंडे संघर्ष होणार हे निश्चित झाले आहे.
काही दिवसांपूवी राष्ट्रवादीचे बीड लोकसभेचे २०१९ मधील उमेदवार बजरंग सोनवणे यांनी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता त्याचवेळी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांनी भेट घेत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर आजचा ज्योती मेटे यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. अद्याप कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत माहिती देण्यात आली नसून लवकरच त्यागोष्टीची स्पष्टता येईल असे सांगण्यात येते. शरद पवार यांच्या भेटीनंतर घेतलेला हा निर्णय पाहता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना संधी मिळेल असे सांगण्यात येत आहे. पवार स्वतः जातीने बीड लोकसभेच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याने ज्योती मेटे यांना उमेदवारी देत पवार भाजपाचा बीड लोकसभा मतदार संघ काबीज करण्याच्या डाव आखात असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या साथीने महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण ज्योती मेटे यांनी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आता भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासाठी सोपी राहिली नाही. बीड जिह्यातील मराठा मतदान, मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न, मराठा आंदोलकांचा रोष, दिवंगत आमदार मेटे यांच्या प्रति असणारी सहानभूती यामुळे राष्ट्रवादीची सोबत असताना देखील अनेक मोठ्या अडथळ्यांना संघर्ष कन्या पंकजा मुंडे यांना सामोरे जावे लागणार आहे. यासंघर्षात भाऊ मंत्री धंनजय मुंडे बहिणीला कशी साथ देतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
ज्योती मेटे यांच्या घोषणेनंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून बीडच्या खासदार ज्योती मेटेच होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दिवंगत आमदार मेटे यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे, मराठा समाजासाठी केलेली कार्य आणि शिवसंग्रामचा विविध प्रश्नासाठीचा लढा शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे जनतेसमोर मांडणार असल्याचे सांगण्यात येते. मनोज जरांगे यांचा देखील ज्योती मेटे यांना पाठींबा मिळेल असे सांगण्यात येत असून वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते देखील ज्योती मेटे यांना पाठिंबा जाहीर करावा यासाठी प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहेत.