पालखी मार्गाच्या कामाची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी आज बोलले.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.