‘एच३एन२’ फ्लू मुळे महाराष्ट्र बाधित होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना करा – अजित पवार

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच३ एन२’ फ्लू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच३एन२’ फ्लूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
‘एच३एन२’ फ्लूच्या शीतज्वराची महाराष्ट्रासह देशात लाट आलेली आहे. वातावरणातील बदल, धुळीचे प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी, तीव्र खोकला, ताप, अंगदुखी याशिवाय मळमळ, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे रुग्णांमध्ये आठवडाभर राहत आहेत. नुकतेच कर्नाटक व हरियाणामध्ये या ‘एच३ एन२’ फ्लूने दोन मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला याशिवाय हृदयरोग, मधुमेह व दम्याच्या रुग्णांना याची लवकर लागण होत आहे.
यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केले आहे. राज्यातही ‘एच३एन२’ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. कोवीड-१९ साथ रोगाचा अनुभव विचारात घेता झपाट्याने वाढलेले प्रमाण व वाढलेली रुग्ण संख्या यांचा विचार करून राज्य शासनाने ‘एच३एन२’ बाबतही योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अजितदादांनी केली.