पर्यावरण  हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे, काळाची गरज आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे , ‘हवामान आणि पर्यावरण’ या विषयांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने महा यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन व्यासपीठाद्वारे ‘युथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन’ या ऑनलाइन स्वयं-गती अभ्यासक्रमाचा ई-शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. “पर्यावरणपूरक जीवनशैलीसह विकासाचा समतोल राखण्यासाठी तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन करण्याची आणि सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून देऊन,पर्यावरण  हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे, काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन यावेळी  चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ ही संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल. सध्या आपण एकाच वेळी अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट पाहत आहोत. हे चिंताजनक असून पर्यावरण अधिकाधिक संवेदनशील होत आहे. तरुण पिढीने हा मुद्दा समजून घेऊन त्यावर संशोधन केले पाहिजे. त्यासाठी हा अभ्यासक्रम  हवामानातील विविध घटकांवर मार्गदर्शन करेल, असे सांगून तरुणांनी वातावरणातील बदलाबाबत काम करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी  केले.

सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया आणि अक्वाडॅम (ACWADAM) पुणे यांच्या तांत्रिक सहाय्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफ महाराष्ट्र यांनी एकत्र येऊन या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये पाच युनिट्स असून त्यापैकी दोन हवामान बदल आणि जल व्यवस्थापन हे दोन अनिवार्य आहेत. ऊर्जा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन हे इतर तीन युनिट्स वैकल्पिक आहेत. या अभ्यासक्रमामध्ये लिखित साहित्य, चित्रे, प्रश्नमंजुषा, समस्या व उपाय, व्हिडिओ आणि संदर्भ लिंक तसेच पर्यावरणाशी संबंधित कौशल्यं आणि नोकरीच्या संधी आदी माहिती उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम विनामूल्य असून इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये पूर्ण करता येईल. महाराष्ट्रातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. यशस्वी उमेदवारांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. हा अभ्यासक्रम  https://www.mahayouthnet.in  वर उपलब्ध आहे.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे सचिव शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनोद मोहितकर, युनिसेफचे युसूफ कबीर, पर्यावरण तज्ज्ञ संस्कृती मेनन, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह विद्यार्थी व प्राचार्य उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!