छत्रपती संभाजीनगर कॉपी प्रकरण : जे विद्यार्थी परीक्षा देतील त्यांच्या प्रश्नपत्रिका विशेष निरीक्षणाखाली तपासल्या जातील – चंद्रकांत पाटील
पुणे : छत्रपती संभाजीनगर कॉपी प्रकरणाची उच्च शिक्षण विभागाने तातडीने दखल घेतली आहे. ज्या ठिकाणी हे प्रकरण चाललं आहे केवळ त्याच्यावर कारवाई न करता त्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देतील त्यांच्या प्रश्नपत्रिका विशेष निरीक्षणाखाली तपासल्या जातील, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
एक वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले कि, विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे, आणि केवळ चौकशी करून इथे ज्या दुकानांमध्ये हे चालू आहे त्याच्यावर ऍक्शन होईल असे नाही पण त्या कॉलेज मध्ये जेजे विद्यार्थी परीक्षा देतील त्यांच्या प्रश्नपत्रिका या अंडर ऑब्सर्व्हेशन आणि स्पेशल निरीक्षणाखाली तपासल्या जातील असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय ?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क ३०० ते ५०० रुपयात मासकॉपी करून दिली जात आहे. धक्कादायक म्हणजे हे रॅकेट झेरॉक्स दुकानदाराच्या मदतीने सुरु आहे. सकाळी परीक्षेवेळी विद्यार्थी कोरी पानं सोडतात आणि सायंकाळी विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर सविस्तर लिहिण्यासाठी दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एक विद्यार्थिनीने पुढे येत या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.