उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार… यामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल – चंद्रकांत पाटील

मुंबई  : आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, ब्रिटीश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी सामंजस्य करारा (MoU) वर स्वाक्षरी केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, जागतिक पातळीवर स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन याला अधिक महत्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरेल. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार होत असून याचा मला आनंद होत आहे. या करारामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच परदेशी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील विद्यापींठाना शैक्षणिक सहकार्य मिळेल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी ब्रिटीश कौन्सिल इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर संबंधित अधिकारी उपस्थित होते.