रोलबॉल वर्ल्ड कप : पुरुष गटात केनियाने विश्वविजेते पद पटकावले ,  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रदान

पुणे : पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये केनियाच्या पुरुष रोल बॉल संघाने विजय मिळवत रोल बॉल विश्वचषकात त्याचे पहिले विश्वविजेते पद पटकावले. अत्यंत मनोरंजक अशा या सामन्यात केनियाने भारताचा ७- ४ असा पराभव केला. रोल बॉल विश्वचषकातील विजयानंतर केनियाच्या पुरुष संघाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

पुण्यात विकसित झालेल्या रोलबॉल ६ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पुरुष गटातील अंतिम सामना भारत विरुद्ध केनिया या दोन संघामध्ये पुण्याच्या बालेवाडी येथे पार पडला. या दोन संघातील अटीतटीच्या सामन्यात केनिया संघाने विजय मिळवत रोल बॉलचे जगज्जेते पद पटकावले. भारतीय खेळाडूंनी सुद्धा या सामन्यात केनिया संघाला तोडीसतोड लढत दिली. चंद्रकांत पाटील यांनी या सामन्यातील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पुण्यातील रोलबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विश्वचषक स्पर्धेला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यासाठी अनेक मान्यवरांनी खूप मेहनत घेतली आणि त्यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे राजू दाभाडे यांचं. या स्पर्धेला यशस्वी बनवल्याबद्दल त्यांना एक विशेष भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.