मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई : आज मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करावा आणि वसतिगृहाच्या कामाला जिल्हास्तरावर अधिक गती द्यावी. ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, या विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित असणारी प्रकरणे व्याज परतावा देऊन एक आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ,महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी),आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या चारही संस्थाच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत शैक्षणिक सुविधा, नियमावली, यासंदर्भात सर्वसमावेशकता असावी, याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार भरत गोगावले,अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) चेअरमन अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!