मातृभाषेतील शिक्षणामूळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन संशोधनाची वृत्ती वाढेल – चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते ‘करिअर कट्टा’ अंतर्गत करिअर संसदेचे उद्घाटन

8

पुणे : सर परशुराम महाविद्यालयात आयोजित ‘करिअर कट्टा’ अंतर्गत करिअर संसदचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘करिअर कट्टा’ च्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयात अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून युवकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण प्रसारक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंटर ऑफ एक्सलन्स समिती करिअर कट्टाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, स.प. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, चॉइस ग्रुपचे फिरोदिया गाडिया आदी उपस्थित होते.

‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य व प्रत्यक्ष उद्योजकांचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्थापन पोलीस भरती, बँकींग सेवा, कमिशन अशा विविध अभ्यासक्रमाचे ३६५ रुपयांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत असून त्यातून विद्यार्थ्यांना यश मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन करुन चालणार नाही त्यांना सर्वदृष्टीने पाठबळ मिळणे आवश्यक आहे असे पाटील यावेळी म्हणाले. महाविद्यालयांनी औद्योगिक कंपन्याशी समन्वय करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणचे ज्ञान मिळण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांन यावेळी दिले.

केंद्र शासनाने सन २०२० साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा केली असून आज त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक कला, वाणिज्य या सारख्या शिक्षण पद्धतीत बदल करून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, नैतिक बहुमुखी शिक्षण आणि आपल्या परंपरेचा अभिमान असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. मातृभाषेतील शिक्षणामूळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन संशोधनाची वृत्ती वाढेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला करिअर कट्टाचे पुणे विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. श्रीकांत देशमुख, पुणे जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी भोसले, शहर समन्वयक डॉ. प्रभाकर घोडके, राज्यातील महाविद्यालयातील प्राचार्य, करिअर करिअर कट्टाचे विभागीय, जिल्हा समन्वयक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.