विविध वस्त्रोद्योग घटकातील ३३ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार, ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक –  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

6
मुंबई : राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी टेक्स फ्युचर – २०२३, ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ ‘ अंतर्गत एकदिवसीय गुंतवणूक परिषद हॉटेल ताजमहल पॅलेस येथे संपन्न झाली. या परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या ५ एफ (फार्म,फायबर,फॅब्रिक,फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत, असे धोरण तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण करणे, ती एकत्रित करणे आणि वस्त्रोद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा या धोरणाचा  उद्देश आहे. आर्थिक विकासाला चालना, रोजगार निर्मिती, कापड उत्पादनात महाराष्ट्राला अग्रेसर राहण्यासाठी टेक्स फ्यूचर गुंतवणूक परिषद एक प्रगतीशील पाऊल आहे. या परिषदेत विविध वस्त्रोद्योग घटकांतील 33 कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून ५ हजार  ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरणात 45 टक्के तांत्रिक वस्त्रोद्योग घटकांना भांडवली अनुदान (सबसिडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोविड काळातील काही वस्त्रोद्योग घटकांचे  भांडवली अनुदान  प्रलंबित राहिले आहे. त्याबाबत आर्थिक तरतूद करून  भांडवली अनुदान लवकरच देण्यात येईल.

शाश्वत उत्पादनासाठी पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भांडवली सबसिडी देऊन विविध युनिट्सला प्रोत्साहन दिले आहे.  तसेच सहा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे, असे सांगून वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या  व्यावसायिक बांधवांचा या परिषदेतील सहभाग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची नांदी आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाच्या सचिव रचना शाह, केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कंसल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे प्रादेशिक संचालक डॉ. राजेश कपूर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.