विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधिक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी दालनामध्ये आज विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार विभाग, जिल्हा तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. अमरावती जिल्हा क्रीडा क्षेत्रामध्ये पूर्वीपासून अग्रेसर आहे. या अनुषंगाने खेळाडूंना स्थानिक पातळीवर आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधिक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतील, असे पाटील यांनी आश्वस्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुल येथे बहुउद्देशीय हॉल, जीम हॉल, ऑफिस कार्यालय, आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज सौंदर्यीकरण इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा क्रीडा संकुलातील अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे तात्काळ पूर्ण करावी. मुला-मुलींकरीता वसतिगृह, कँटिन, सिंथेटिक ट्रॅक, कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट यासारख्या स्थानिक खेळांच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव क्रीडा विभागाने तात्काळ सादर करावा. तसेच विजेच्या वापराबाबत बचत करण्यासाठी सौर पॅनलवरील प्रकाशझोत, विद्युत व्यवस्था महाऊर्जा मार्फत बसविण्यात यावी.
आंतरराष्ट्रीय खेलो इंडिया आर्चरी रेंज अत्याधुनिक करण्याबाबत कृत्रिम पॉलीमर ग्रास लावण्यासाठी अंदाजपत्रक व आराखडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तयार करण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले. सद्यस्थितीत तयार असलेल्या सुविधांची अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करुन जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूंना व्हावा, यासाठी ऑगस्ट 2024 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येथील कामे पूर्णत्वास न्यावी. जेणेकरुन या संकुलाचा लोकार्पण सोहळा करुन खेळाडूंना क्रीडा सुविधा लवकर उपलब्ध करुन देता येईल. येथील कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत क्रीडा विभाग तसेच बांधकाम विभाग यांना निर्देश देण्यात आले.
क्रीडा संकुलातील सुविधांची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन होण्यासाठी क्रीडा सुविधा संघटना, तज्ज्ञ मार्गदर्शक, संस्था, मंडळे यांना विहित अटी व शर्तीवर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने व देखभालीसाठी चालविण्यास द्यावे. तसेच विभागीय क्रीडा संकुलातील उपलब्ध असलेली क्रीडांगणे, 400 मी. धावनपथ यांचे सिंथेटिक अत्याधुनिक क्रीडांगणे तयार करणे व अन्य क्रीडा सुविधा यासाठी संकुलाच्या लगतच्या परिसरातील जागा मागणीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. जेणेकरुन एकाच परिसरात खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा प्राप्त होतील. तसेच क्रीडा संकुलातील अन्य क्रीडा सुविधांचेही नुतनीकरण करण्यात यावे.
या संकुलातील क्रीडा सुविधांचा वापर बघता आवश्यक ते मनुष्यबळ बाह्यस्त्रोतावर घेण्यात यावे. तसेच क्रीडा सुविधेकरिता निधी कमी पडत असल्यास केंद्र शासन, राज्य शासन यासह जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपूर्ण योजनेतून अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलंपिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊन विद्यार्थी व युवकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.