अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न

22

अमरावती : आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे शासन, प्रशासनाचे कर्तव्य असते. त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करुन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. शासन-प्रशासन, संस्था व नागरिकांच्या सर्वंकष प्रयत्नांनी आपण सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहोत. समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

यावेळी पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 77 वर्षाचा मोठा प्रवास देशाने केला आहे. स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेव्दारा न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मुल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तसेच देशभक्तीचे जाज्वल्य तेवत ठेवण्यासाठी यंदाही देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान दि. 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात आले. यामुळे देशभक्तीपर आणि चैतन्यमय वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी 24/7 तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास 2 हजार महिलांच्या फोनव्दारे समस्या सोडविल्या. असा मदत कक्ष स्थापन करणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात आजपावेतो 4 लक्ष 150 महिलांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत सुमारे 3 लक्ष 80 हजार अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. या भगिनींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचा लाभ एकत्रितरित्या देण्यात येणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘लेक लाडकी’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत महिला बाल विकास विभागामार्फत सुमारे 1 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य सुरु आहे.

युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या क्रांतीकारी निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्ष सन 2024-25 पासून करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ व ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. श्रवणयंत्र, चष्मा, ट्रायपॉट, स्टीक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात तीन हजार रुपयापर्यंतचे डीबीटी प्रणालीव्दारे रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 408 अर्ज प्राप्त झाले असून लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी 24 तृतीयपंथीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य शासन एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के शुल्क माफिचा लाभ मंजूर करण्यात येत आहे.

अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने बेलोरा विमानतळाचे काम गतीने सुरु असून विमानतळ इमारत, रनवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच रात्रीच्यावेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. लवकरच अमरावतीकरांच्या सेवेमध्ये बेलोरा हे अत्याधुनिक विमानतळ सुरु होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहकार्य करणार असून यामुळे मिलमधील कामगारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे काम गतीने सुरु आहे. अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील मंजूर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी वापरावे यावर भर देण्यात येत आहे.

याशिवाय मेळघाट परिसरात निसर्ग पर्यटन, आयुर्वेदिक औषधनिर्माण व आरोग्य सुविधांचा विकास करणे आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा टक्का वाढवणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकास कामांवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटनासाठी चिखलदरा, भीमकुंड जायंट स्वींग तसेच आमझरी येथे साहसी खेळांतर्गत स्काय सायकल, क्लायमिंग वॉल आदी सुरु करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये 79 कोटींची म्हणजेच 20 टक्क्यांची ज्यादा वाढ करण्यात आलेली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करुन त्यांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात 50 हजार योजनादूत निवडण्याचे शासन धोरण आहे. तसेच जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुलभ व्हावे व क्रीडापटुंना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. येथे सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील नाविण्यपूर्ण योजनेतून धर्नुविद्या, अत्याधुनिक जीम, कुस्ती, ज्युडो यासह ऑल ग्लास स्क्वॅश कोर्ट उभारण्यात आले आहे. नांदगाव पेठ येथे अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून तेथे भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सन 2023-24 मध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून मेंदूविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक मशिनरी खरेदी करुन या शस्त्रक्रिया चालू करण्यात आल्या आहेत. 41 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त भूसुधार श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त वैशाली पाथरे आधी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.