ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

94

मुंबई : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना  दिले.

पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.