धोंडेवाडीतील लोकसहभागातून साकारलेले शिवस्मारक समाजासाठी आदर्श – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : एका छोट्याशा गावाने एकत्रित येऊन, स्वखर्चातून आणि श्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे करणे, ही बाब अतिशय कौतुकास्पद असून ती समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भोर तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुदत्त कला क्रीडा प्रशिक्षण व ग्रामस्थ मंडळ आणि धोंडेवाडी-चिखलगाव येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून -पाटील यांनी पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला माजी आमदार संग्राम थोपटे, स्वरूपा थोपटे, भाजपा अध्यक्ष शेखर वडणे, पोपटराव सुखे, अतुल केंदळे, विठ्ठलराव धोंडे यांच्यासह इतर सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.